

पूर्णा : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कात्नेश्वर शिवारात एका तस्कराला गुटख्यासह पकडण्यात आले आहे. कॅनल रस्त्याने मोटारसायकलवरुन थैलीत प्रतिबंधीत गुटखा पुड्यांची तस्करी केली जात होती. ता.५ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा परभणी व पूर्णा पोलिस पथकाने संयुक्त सापळा रचून एरंडेश्वर येथील एका गुटखा तस्करास रंगेहात पकडले.
या बाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर शिवारात असलेल्या कॅनल रस्त्याने चोरट्या पद्धतीने मोटारसायकलवरुन बंदी असणा-या गुटखा पुड्यांची तस्करी केली जात होती. या विषयीची गुप्त माहिती स्थागुशा पथकाला मिळाली. त्यावरुन पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पोनि विवेकानंद पाटील व पूर्णा पोलिस ठाण्याचे पोनि विलास गोबाडे, पोउनि परिहार चंदनसिंह, पोलिस कर्मचारी सचिन भदरगे, हनुमान ढगे, जमादार श्याम काळे या पथकाने सापळा रचून ५ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सापळा रचून दुचाकीवरील थैलीत ठेवलेल्या गुटखा पुड्या रंगेहाथ पकडल्या.
यात प्रतिबंधीत राजनिवास नावाचे काही गुटखा पुडे एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडून जप्त करीत गुटखा तस्कर घोरबांड यास ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध गुटखा बंदी कायदा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.