

MSEDCL Bill Issue
पेठ शिवणी : पालम तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत पेठशिवणी गावात खाजगी कंपनीच्या मंडळीने घरगुती वापराचे पूर्वीचे सुरळीत चालणारे पोस्टपेड मीटर काढून सक्तीने स्मार्ट मीटर बसवले त्यानंतर एका ग्राहकाला महिन्याचे 87 हजार रुपये बिल दिल्याने संबंधित ग्राहक हैराण होऊन त्यांनी न्याय मागण्यासाठी परभणी ग्राहक संरक्षण परिषदेत पालम वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हा संघटन मंत्री भगवान करंजे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्य सरकारने एका भांडवलदार खाजगी कंपनीला पालम तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत डिजिटल स्मार्ट अथवा प्रीपेड मीटर बसवण्याचे कंत्राट दिलेली आहे. सदर खाजगी कंपनीची मंडळी गावागावात जाऊन संबंधित ग्राहकांना कोणतीही माहिती न देता आम्ही विद्युत मंडळाचे असून तुमच्या घरचे पूर्वीचे मीटर काढून नवीन मीटर बसवण्यासाठी आलो आहोत असे खोटे बोलत आहेत. ग्राहकांना स्मार्ट अथवा प्रीपेड मीटर च्या संबंधी कोणतीही माहिती दिल्या जात नाही मीटर बसविताना काही ठिकाणी मनमानीपणे पूर्वीचे मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यात आले असल्याचे अनेक ग्राहकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या कार्यकर्त्याकडे बोलून दाखवले आहे.
ग्राहक संरक्षण कायदा अन्वये संबंधित खाजगी कंपनीच्या मीटर बसवणाऱ्या व्यक्तीने ग्राहकांना स्मार्ट अथवा प्रीपेड मीटर च्या संबंधी सविस्तर माहिती सांगून त्यांची परवानगी घेऊनच मीटर बसवणे बंधनकारक आहे. मात्र ग्राहक स्वतःचे अधिकार व हक्काबाबत अज्ञानी आहे. याचाच गैरफायदा संबंधित मीटर बसवणारे कंपनीचे मंडळी घेत असून ग्राहकाच्या हक्काचे पायमल्ली केली जात असल्याचे एकंदरीत प्रकरणावरून दिसून येते. यासाठी ग्राहकांनी जागे होण्याची गरज आहे.
दरम्यान पेठ शिवनी येथील लक्ष्मण केरबा बेडदे यांच्या घरी संबंधित कंपनीच्या मंडळींनी सक्तीने सुरळीत चालणारे पूर्वीचे पोस्टपेड मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले त्यानंतर त्यांना एका महिन्याचे 87 हजार रुपये बिल देऊन पालम वीज वितरण कंपनीने पराक्रम दाखवला आहे. यामुळे संबंधित ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात बिल दुरुस्ती करण्यासाठी गेला असता संबंधित कर्मचाऱ्यांनी दोन-तीन दिवसानंतर या अशी म्हणून सांगितले त्यानंतर त्यांनी न्याय मागण्यासाठी पालम वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत लेखी तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे परभणी जिल्हा संघटन मंत्री भगवान करंजे यांच्या मार्फत दाखल केली आहे.