शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट

Shaktipeeth Expressway | मार्ग रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
shaktipeeth expressway
shaktipeeth expresswayPudhari
Published on
Updated on

सिंदगी : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात सिंदगीसह परिसरातील शेतकरी आता आक्रमक झाले असून, प्रस्तावित मार्ग तत्काळ रद्द करण्यासाठी एकजूट होत असल्याचे चित्र दिसत आहे. कळमनुरी तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गामुळे अनेक गावांतील सुपीक शेतजमिनी संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शेवाळा, पिंपरी (खुर्द), आडा, आखाडा बाळापूर, देवजना, कांडली, काळ्याचीवाडी, भुरक्याचीवाडी, पावनमारी, बऊर, पेठवडगाव, टव्हा, निमटोक, जांब, पोत्रा, सिंदगी आदी गावांतील शेतजमिनी या महामार्गासाठी जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शासनाने पूर्वीच्या प्रस्तावित मार्गात बदल करून नव्याने सर्वेक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने बाधित गावांमध्ये बैठकींचे सत्र सुरू झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर सिंदगी येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती मराठवाडा प्रमुख गोविंद घाटोळ, शेतकरी नेते सतीशराव घाडगे, डॉ. सतीशराव देसाई, विजयराव बेले, पराग अडकीने यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. बैठकीत शेतकरी नेत्यांनी शासनावर जोरदार टीका करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, हा महामार्ग स्थानिकांच्या हिताचा नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे. हा मार्ग केवळ कागदोपत्री विकासाचा दिखावा आहे. यामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होतील, शेती उद्ध्वस्त होईल आणि पुढील पिढ्यांसमोर उपासमारीची वेळ येईल. हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा संतप्त सूर बैठकीत उमटला.

परिसरातील निसर्गसंपदा, पाणी स्रोत आणि शेतीव्यवस्था धोक्यात येणार असून, हा मार्ग रद्द करण्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र उभे राहण्याची गरज आहे. बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनीही तीव्र भावना व्यक्त करत शासनाने प्रस्तावित मार्ग तात्काळ रद्द करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. सिंदगीसह परिसरातील शेतकरी आता संघटित होत असून, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मोठ्या संघर्षाची ठिणगी पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news