

परभणी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आपल्या विरोधात काहीही बोलले तरी मी प्रतिक्रिया देणार नाही, तुम्हीही द्यायची नाही. ठाकरेंचे मी मीठ खाल्लं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी अनुदगार काढणार नाही! बाकी कुणाच्या बापाला मोजायची गरज नाही, असे वक्तव्य खा. संजय जाधव यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.
ठाकरेंच्या शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर सोमवारी सायंकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांचे शहरात आगमन झाले. खा. जाधव यांच्या आगमणानिमित्त समर्थक कार्यकर्त्यांकडून दत्तधाम ते खासदार निवासस्थान अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खा. संजय जाधव बोलत होते. येणार्या काळात आरोप-प्रत्यारोप होतील, त्याकडे लक्ष देऊ नका. सहन करा, असे आवाहन खा. जाधव यांनी कार्यकर्त्यांना केले.
शिवसेना नेते खा.संजय राऊत मोठ्या उंचीचा माणुस आहे. उत्तम वक्ते आहेत, त्यांना आपल्या सहकारी खासदारांना शिव्या देणे शोभत नाही. खा. संजय राऊत यांनी तुडवायची भाषा करू नये, ती आम्हाला चांगली अवगत असल्याचे खा. जाधव म्हणाले.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव वेगळी भूमिका घ्यावी लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्यावर कितीही टिका केली तरी मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, कार्यकर्त्यांनीही त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याची सूचना खा. जाधव यांनी केली. आपला मुळ डीएनए शिवसेनेचा असून इतर कुठल्याही पक्षात गेलो नाही.
वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेतच आलो आहे, असेही ते म्हणाले. काही लोक पैसे घेऊन शिंदेसेनेत प्रवेश केला का? असे विचारत आहेत. पैसे घ्यायचेच असते तर ते २०२२ लाच घेतले असते, असेही खा. जाधव म्हणाले. आगामी पुढील ३ वर्षाच्या काळात विकासात्मक दृष्टीकोन ठेवून काम करू. कार्यकर्त्यांना कुठलीही अडचण येऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.