२१ वर्षांची प्रतीक्षा संपली ! जामगव्हाणच्या गाव-पठारावर पुन्हा धावली लालपरी; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

MSRTC rural connectivity: दोन दशकांपूर्वी अचानक बंद झालेली ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील विद्यार्थी आणि प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
MSRTC News
MSRTC NewsPudhari Photo
Published on
Updated on

औंढा नागनाथ : तब्बल २१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण गावात अखेर राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा मुक्काम सुरू झाला आहे. दोन दशकांपूर्वी अचानक बंद झालेली ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने जामगव्हाण, पिंपळदरी, जलालदाभा परिसरातील विद्यार्थी आणि प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अखेर २१ वर्षांचा वनवास संपला

वसमत आगाराची बस २१ वर्षांपूर्वी जामगव्हाण येथे मुक्कामी थांबत असे, ज्यामुळे विद्यार्थी आणि नोकरदारांना सकाळी तालुक्याच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे सोपे जात होते. मात्र, ही सेवा अचानक बंद झाल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी हिंगोली आगार प्रमुख सौ. सुनीता गोरे आणि परभणीचे विभागीय नियंत्रक सचिन डफळ यांच्याकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. विद्यमान आमदार संतोष बांगर यांनीही या प्रकरणात जातीने लक्ष घालून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सामूहिक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

सोमवारी रात्री मुक्कामी बस गावात पोहोचताच ग्रामस्थांनी जल्लोषात तिचे स्वागत केले. सरपंच राहुल क्यातमवार, रावसाहेब पाटील, दादाराव पाटील, परमेश्वर मुकाडे यांच्यासह ग्रामस्थांनी चालक आत्माराम सांगळे आणि वाहक तुकाराम भुक्तर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि बसची विधिवत पूजा केली. ही बस सकाळी ६ वाजता जामगव्हाण येथून औंढा नागनाथकडे रवाना होणार असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

औंढा बस स्थानकाच्या विकासालाही गती

दरम्यान, जालना विभागीय नियंत्रक सौ. मनीषा सपकाळ आणि वाहतूक अधीक्षक योगेश गीते यांच्या पथकाने औंढा नागनाथ बस स्थानकाची पाहणी केली. त्यांनी हिंगोली ते बीड आणि औंढा ते जामगव्हाण या नवीन बससेवा सुरू केल्याबद्दल हिंगोली आगार प्रमुख सौ. सुनीता गोरे यांचे विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी स्थानकाच्या विकासासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या:

  • प्रवाशांसाठी स्वच्छ आणि सुसज्ज शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.

  • बस स्थानक परिसराची नियमित स्वच्छता राखणे.

  • रिकाम्या जागेत वृक्षारोपण करणे आणि एक 'सेल्फी पॉईंट' तयार करणे.

  • मानव विकास मिशनच्या बस फेऱ्यांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करणे.

यावेळी औंढा बस स्थानकात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात तपासणी पथकातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मागील वर्षी औंढा बस स्थानकाला १०० पैकी ६८ गुण मिळाले होते. यावर्षी होत असलेली सुधारणा आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा लक्षात घेता, स्थानकाचे रुपडे पालटणार असून, तपासणी पथक किती गुण देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news