Gangakhed News | गंगाखेडात १८०९ चा दुर्मिळ शिलालेख सापडला; इतिहासातील दुर्मिळ घटना प्रथमच आली समोर

गोदावरी नदीच्या पात्रात मगरहल्ल्यात ब्रिटिश अधिकाऱ्याचा मृत्यूचा उल्लेख
Gangakhed News
Gangakhed News | गंगाखेडात १८०९ चा दुर्मिळ शिलालेख सापडला; इतिहासातील दूर्मिळ घटना प्रथमच आली समोर
Published on
Updated on

गंगाखेड : येथील गोदावरी नदीकाठावर पुन्हा एकदा इतिहासाने आपले गूढ उलगडले असून, ब्रिटिशकालीन दुर्मिळ शिलालेखाच्या शोधामुळे इतिहास संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या शिलालेखातून आजवर कुठेही नोंद न झालेली माहिती प्रथमच समोर आली आहे. २० डिसेंबर १८०९ रोजी गोदावरी नदीत स्नान करत असताना मगरहल्ल्यात ब्रिटिश अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे या शिलालेखात नमूद आहे.

गंगाखेड येथील मंदिराच्या पश्चिमेस सुमारे ३०० मीटर अंतरावर, गोदावरी नदीकिनारी एका छोट्या ब्रिटिश कब्रस्थानाचे अवशेष आढळून आले. या ठिकाणी एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक असून, त्यासमोर २ x २ फूट आकाराच्या गुळगुळीत काळ्या बेसाल्ट दगडावर इंग्रजी भाषेत कोरलेला शिलालेख आढळला आहे. शिलालेखावरील अक्षरे कलात्मक व वळणदार असून, काही भाग अस्पष्ट झालेला आहे.

या शिलालेखाचे वाचन व अभ्यास (इतिहास विभाग, शेषाबाई मुंढे महाविद्यालय) यांनी केले असून, त्यांनी या शिलालेखातील माहिती मराठीत अनुवादित केली आहे. त्यांच्या मते, शिलालेख हे इतिहासातील घटनांचे समकालीन व वस्तुनिष्ठ पुरावे असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे.

शिलालेखातील मजकुरानुसार, ब्रिटिश सैन्यातील लेफ्टनंट एच. ए. हॉवेल हे सेकंड बटालियन व फिफ्थ नेटिव्ह इन्फंट्री रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले आहे. २० डिसेंबर १८०९ रोजी गोदावरी नदीत स्नान करत असताना मगरहल्ल्यात ते नदीत ओढले गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे या शिलालेखात नमूद आहे. अशा प्रकारचा उल्लेख असलेला शिलालेख अत्यंत दुर्मिळ मानला जातो.

इतिहासतज्ज्ञ डॉ. खोकले यांनी सांगितले की, हा शिलालेख (इ.स. १८०३ ते १८२९) यांच्या कारकिर्दीतील आहे. त्या काळात निजाम संस्थानाने ब्रिटिश सैन्याची तैनाती स्वीकारल्यामुळे गंगाखेड येथे मोठ्या प्रमाणावर सैन्य छावण्या व प्रशिक्षण केंद्रे अस्तित्वात होती. त्यामुळे या भागात इंग्रजांची मोठी वर्दळ होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गोदावरी स्वच्छता मोहिमे दरम्यान माणिकराव मुंढे व चंदन लटपटे यांनी हा शिलालेख शोधण्यात मोलाचे योगदान दिले आहे. या शोधामुळे गंगाखेडच्या इतिहासात नव्या माहितीची भर पडली असून, प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाबरोबरच आधुनिक इतिहासाच्या अभ्यासासाठीही हे ठिकाण महत्त्वाचे केंद्र असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news