

परभणी : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नांदेड- रायचूर आणि पूर्णा-पटना या दोन महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा विस्तार आता जालना पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे जालना, परभणी, पूर्णा, नांदेड तसेच परिसरातील नागरिकांना रायचूर व पटनाकडे जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
या विस्तारासाठी राज्यसभेच्या खासदार खा. डॉ. फौजिया खान यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना विशेष विनंती केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने नांदेड-रायचूर ही गाडी तात्पुरत्या स्वरूपात जालन्यावरून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी जालन्याहून नांदेडला येईल आणि पुढे रायचूरकडे धावेल. तसेच पूर्णा-पटना ही गाडी देखील आता जालन्याहून सुरू होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वेसेवांचा विस्तार झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मराठवाड्यातील जनतेला सोयीस्कर प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध झाली आहे. या प्रयत्नाबद्दल खासदार डॉ. फौजिया खान यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.