

Purna lumpy disease bull death
पूर्णा : तालुक्यातील पांगरा लासीना येथील शेतकरी संदीप माधव ढोणे यांच्या गोठ्यातील एक मोठा बैल लंपी स्किन डिसीजने बाधित होऊन उपचार करूनही दगावला. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या या घटनेमुळे ढोणे यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
मागील काही दिवसांपासून पांगरा व तरंगल परिसरातील पशुधनाला लंपी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शरीरावर गाठी येणे, ताप चढणे अशी या आजाराची लक्षणे असून, अनेक शेतकरी महागडे उपचार करूनही जनावरे वाचवण्यात अपयशी ठरत आहेत. तब्बल १५ दिवस सतत उपचार करूनही आजार आटोक्यात येत नाही, परिणामी जनावरांचा मृत्यू होत आहे.
गेल्या काही दिवसांत गौर, पांगरा आदी गावांतील अनेक जनावरे लंपीमुळे दगावली आहेत. शासकीय पशुवैद्यकीय सेवेतील दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागत असून त्यामुळे मोठा आर्थिक बोजा वाढला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेले असताना लंपीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ढोणे यांनी बाधित बैलावर १५ दिवसांहून अधिक काळ उपचार करून घेतले. यासाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च झाला. तरीही बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लंपी बाधित जनावरांसाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.