

पूर्णा: पूर्णा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील अकोला लोहमार्गालगत असलेले रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बुधवारी (३१ डिसेंबर) मोठी कारवाई केली. रेल्वे इंजिनिअरिंग विभागाने पोकलेन आणि बुलडोझरच्या साहाय्याने सुमारे २० पक्क्या घरांचा अतिक्रमित भाग पाडून टाकला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे पूर्णा स्थानक परिसराची अधिकृत मोजणी करण्यात आली होती. या मोजणीनुसार, अकोला लोहमार्गाच्या दक्षिण दिशेकडे २२ मीटरपर्यंतची जागा रेल्वेच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. या जागेत अनेक नागरिकांनी विनापरवाना पक्की घरे बांधली होती. रेल्वेने यापूर्वीच पिवळ्या रंगाने खुणा करून संबंधित नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याच्या दोन वेळा नोटिसा दिल्या होत्या. मात्र, मुदतीत अतिक्रमण न काढल्याने अखेर प्रशासनाने बळाचा वापर करून ही कारवाई केली.
या कारवाईत गणेश भिसे, विनय चंडालिया, विनोद सहजराव, फिरोज पठाण, शेख अखिल, अजिज बेकरीवाले, कलीम सय्यद यांसह सुमारे २० ते २५ जणांच्या घरांचा काही भाग पाडण्यात आला. तसेच येथील आक्सा मशिदीचा काही भागही जमीनदोस्त करण्यात आला. भर थंडीत घरांवर बुलडोझर चालल्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
अकोला लोहमार्गावर वाढलेली रेल्वे वाहतूक आणि होणारी कोंडी लक्षात घेता, या ठिकाणी नवीन रेल्वे ट्रॅक (Third Line) उभारण्यात येणार आहे. या नवीन ट्रॅकसाठी जागा मोकळी करणे आवश्यक असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे इंजिनिअरिंग विभागाचे कर्मचारी सुबोधकुमार यांनी दिली. हैदराबाद आणि नांदेड विभागाच्या संयुक्त नियोजनातून ही मोहीम राबवण्यात आली.