

Tractor Accident Dispute
पूर्णा : तालुक्यातील कावलगाव येथे एका ट्रॅक्टर मालकाने सहा महिन्यांपूर्वी ऊसाचा ट्रॅक्टर पलटी झाला असता झालेल्या नुकसानीची भरपाई दे म्हणून चालकास जबर मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात २४ जून रोजी दोघा संशयीत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथे रामेश्वर उर्फ बाळू पिसाळ यांच्या ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर गावातीलच तरुण मुंजाजी रामदास कंठे (वय २७) हा चालक म्हणून काम करत असे .दरम्यानच्या काळात सहा महिन्यांपूर्वी तो नृसिंह कारखाना येथे ऊस खाली करून कावलगांवकडे परत येत होता. इतक्यात लोहगाव नजीक येताच तो चालवत असलेला ट्रॅक्टर अचानक पलटी झाला होता. यात सदर वाहनाचे नुकसान झाले होते. तद्नंतर पलटी झालेले ट्रॅक्टरची नुकसान भरपाई देण्यासाठी मालक बाळू पिसाळ हे नेहमी त्रास देत होते.
या विषयी दोघांत वाद- विवाद होऊन मुंजाजीस मारहाण देखील झाली होती. दरम्यान, याच वादाचे कारण पुढे करुन २३ जुन सोमवार रोजी उशिरा ट्रॅक्टर मालकाने मुंजाजीस फोन लावून कावलगांव बस स्थानका जवळ बोलावत पैशाची मागणी केली. मुंजाजीने कशाची भरपाई द्यायची असे म्हणताच बाळु पिसाळ याने रामभाऊ वांगकर यांच्या किराणा दुकाना समोर लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या समवेत असलेला अंबादास पिसाळ ह्याने विटकरीने मुंजाजी यांच्या मानेवर तोंडावर जबर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडला. या दरम्यान नुकसान भरपाई नाही दिल्यास व पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास खतम करुन टाकतो अशी जिवे मरण्याची धमकी दिली.
यावेळी मारहाण होत असताना पुढील अनर्थ टळावा म्हणून प्रभावती सावंत, राजाबाई कंठे यांनी भांडण सोडवा सोडवी केली. दरम्यान, मुंजाजी यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. २४ जून रोजी मुंजाजी रामदास कंठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक बाळू पिसाळ, अंबादास पिसाळ या दोघांविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुर नं १४६/२०२५ भान्यासं कलम ११८(१),११५,३५२,३५१(३),३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास प्रभाकर कच्छवे करत आहेत