

पूर्णा : शहरातील पंचशील नगर परिसरात बाभळीच्या झाडावर हळद-कुंकू लावून लहान ‘चेटकीण’ बाहुल्या खिळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक, विशेषत: महिलामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जादूटोणा करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याची चर्चा परिसरात रंगली होती.
घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे यांनी पोलिसांना दिल्यानंतर प्रशासन तत्काळ अलर्ट झाले. घटनास्थळी बौद्ध विहार येथील भंतेजी पय्यावंश, नगरसेवक गौतम भोळे, पोलिस कर्मचारी तसेच स्थानिक कार्यकर्ते दाखल झाले. नागरिकांना समजावून सांगत त्यांनी हा प्रकार जादूटोणा नसून अंधश्रद्धेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. यानंतर झाडावर खिळवलेल्या बाहुल्या उतरवून त्यांना जाळून नष्ट करण्यात आले. अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी हा प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचा हेतू या मागे असावा का, याबाबत चर्चा सुरू आहे. पंचशील नगरातील नागरिकांनी दाखवलेली जागरूकता आणि एकजूट ही समाजातील अंधश्रद्धांना दिलेला ठोस संदेश मानला जात आहे.
अंधश्रद्धेविरोधात जनजागृतीची गरज
घटनेनंतर सामाजिक संघटनांकडून पुन्हा एकदा अंधश्रद्धेविरोधात जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. अशा प्रकारांना बळी न पडता विवेकाने विचार करावा, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तत्काळ पोलिस किंवा संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.