

Parbhani Youth Drowning Pune pavana River
मानवत : पुणे येथे कामासाठी गेलेल्या मानवत तालुक्यातील मानोली येथील २२ वर्षीय युवकाचा पवना नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. १६) सायंकाळी घडली. या घटनेमुळे मानोली गावावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी (दि. १७) मृतदेह मानोली येथे आणण्यात आला. सकाळी ११ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामेश्वर ज्ञानोबा भांड (वय २२) असे मृत युवकाचे नाव असून तो मानोली (ता. मानवत) येथील रहिवासी होता. रामेश्वर हा १४ एप्रिल रोजी मित्रांसोबत पुणे जिल्ह्यातील साळुंब्रे येथे कामासाठी गेला होता. काम आटोपल्यानंतर तो मित्रांसह पवना नदी परिसरात पोहण्यासाठी गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
घटनेची माहिती मिळताच शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी किशोर गिरीगोसावी यांनी तत्काळ यंत्रणा घटनास्थळी पाठवली. वन्यजीवरक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र, लोणावळा यांच्या पथकांनी सुमारे चार तास शोधमोहीम राबवून अखेर युवकाचा मृतदेह बाहेर काढला.
रामेश्वरच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तो मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई व दोन लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या आकस्मिक निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.