

मानवत : शहरात बनावट मृत्यू प्रमाणपत्रांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण केल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संबंधित व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, काही व्यक्तींनी संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून खोटे व बनावट कागदपत्र तयार केले. त्यामध्ये मृत्यू दाखले जोडून दस्त नोंदणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे कायदेशीर वारसांचे हक्क डावलून मालमत्तेचा व्यवहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचा मृत्यू अन्यत्र झालेला असताना तो मानवत येथे झाल्याचे दाखविण्यात आले. तसेच वेगवेगळ्या तारखा व ठिकाणे नमूद करून दोन मृत्यू प्रमाणपत्रे वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या दाखल्यांच्या आधारे संबंधित मालमत्तेची नोंदणी करून व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचे म्हटले आहे.तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, संबंधित मालमत्तेवर कायदेशीर वारसांचा हक्क असताना तो हिरावून घेण्यासाठी संगनमताने हा प्रकार करण्यात आला.
दस्तातील साक्षीदार, संबंधित लाभार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारा वकील आणि काही अधिकारी यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यापूर्वीही या संदर्भात दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज देण्यात आला होता. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबधित अर्जदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात तत्कालीन अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
गंभीर गुन्ह्याची शक्यता
खोटे मृत्यू दाखले, बनावट कागदपत्रे आणि मालमत्ता हस्तांतरण या तिन्ही बाबी गंभीर स्वरूपाच्या असून यामध्ये फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व संगनमत यांसारखे गुन्हे लागू होऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे.
नागरिकांत चर्चा
मानवत शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, “जर तक्रारीतील आरोप खरे ठरले तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता प्रशासन या तक्रारीवर कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.