

परभणी : देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. केंद्र सरकार कमजोर आहे तर राज्य सरकारला राज्य चालवता येत नाही. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (दि.१६) केला. परभणीत पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकार्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्याप्रमाणे जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. या दरम्यान आंबेडकरी जनतेने सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जाहीर सभा घेतली. या सभेस ज्येष्ठ आंबेडकरी नेत्यांसह अॅड.आंबेडकर यांनी विचार मांडले. अॅड.आंबेडकर यांच्या उपस्थितीत सोमनाथ सुर्यवंशी याची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी झालेल्या सभेत बोलताना आंबेडकर यांनी बांग्लादेशच्या नाड्या भारताच्या हातात असताना हिंदूंचा मोर्चा काढला जात आहे. केंद्राने तेथील सरकारला वटणीवर आणण्याची गरज असताना आपल्या देशातच मोर्चे काढले जात आहे. यातूनच केंद्र सरकारचा कमजोरपणा दिसून येत आहे. परभणीतील संविधानाच्या अवमानाची घटना निषेधार्ह असताना या संदर्भात आंदोलकांवरच राज्य सरकारने बेदम लाठीमार केला. पोलिस बेकाबू झाले असून त्यांच्या डोक्यात धर्म व द्वेषच असल्याचे दिसून येवू लागले आहे. कायदा हातात घेवून बडवण्याचे काम या पोलिसांनी केले असून त्यामुळेच एक भिमसैनिक शहीद झाला आहे, असा आरोप करीत या प्रकरणास जबाबदार पोलिस अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. सुर्यवंशी याच्या कुटूंबियांना मदत करून पुर्नवसन करण्यात यावे, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. व्यासपिठावर ज्येष्ठ नेते विजय वाकोडे, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, रवि सोनकांबळे, सुधीर साळवे आदी उपस्थित होते.