

People's representative strength carry out development work Ajit Pawar
जिंतूर, पुढारी वृत्तसेवा नगर परिषदेच्या निवडणुक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील विकासकामांवर मोठे बोट ठेवत, लोकप्रतिनिधी होणे म्हणजे फक्त नावापुरते नव्हे, तर विकासकामे करण्याची धमक आणि ताकद असावी लागते. हे काम येड्या-गबाळ्याचे नाही, अशा शब्दांत स्थानिक प्रशासनावर टीका केली. शहरात येताना रस्त्यांवर पडलेले कचऱ्याचे ढिगारे पाहून त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
येथील दादा शरीफ चौक परिसरात सोमवारी (दि. २४) सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.राजेश विटेकर, माजी आ. विजय भांबळे, सुरेश नागरे, प्रेक्षा भांबळे, अमृता नागरे, साबिया बेगम कपिल फारूखी, लक्ष्मण बुधवंत, बाळसाहेब भांबळे, विश्वनाथ राठोड, अजय चौधरी, मुर लीधर मते, केशवराव बुधवंत, शौकत लाला, हकीम लाला आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सबिया कफिल फारूखी यांच्यासह सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली.
सभेत अजित पवार म्हणाले, जिंतूरचे रस्ते, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत मोठ्या तक्रारी आहेत. मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना, मंगल कार्यालय, नाट्यगृह यांसारखी अनेक कामे रखडली. नगर परिषदेने मागील काही काळात याकडे लक्ष दिले नाही. ही कामे गतीमान करण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी गरजेचे आहेत.
माजी नगराध्यक्ष दिवंगत कफिल फारूखी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या अधुऱ्या कामांना पूर्णत्व देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात काही ठिकाणी घडत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहनही पवार यांनी केले कोणी विरोधक त्रास देत असल्यास त्यांच्याशी वाद घालू नका.
वरिष्ठ नेत्यांना कळवा. आचारसंहितेचे काटेकोर पालन करा आणि शांततेने प्रचार करा, असे ते यावेळी म्हणाले. सभेला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. सुरेश नागरे यांनी शहरातील अपेक्षित विकास पूर्णत्वाकडे नेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. राष्ट्रवादी पक्षाला सत्ता दिल्यास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे विकासासाठीचा निधी कमी पडू देणार नाहीत, असे भाषणात सांगितले.
अतिरिक्त जिल्हा न्यायालयासाठी प्रयत्न
माजी आ. विजय भांबळे यांनी शहरातील अनेक झळकणारे प्रश्न उपस्थित केले. तसेच साबिया बेगम यांनी हिंदू मुस्लिम भावना मनात न ठेवता हिंदुंची १५ मंदिरे शहरात बांधली. दलितांसाठी उत्तम दर्जाचे बौध्द विहार बांधल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शादीखाना, मंगल कार्यालय आणि कचरा व्यवस्थापनाची समस्या लवकरच मार्गी लावली जाईल. तसेच जिंतूर शहरासाठी अतिरिक्त जिल्हा न्यायालय मंजूर करण्यासाठी स्वतः मी सरकार दरबारी पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.