चारठाणा, पुढारी वृत्तसेवा : मागील दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. या विवंचनेतून जिंतूर तालुक्यातील सोस येथील ३० वर्षीय तरुणाने चिट्ठी लिहून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (दि. २१) रात्री उशीरा उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यातील मराठा आरक्षणाचा सहावा बळी ठरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील सोस येथील विनायक बाबाराव शिंदे (वय ३०) या तरुणाचा मागील वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग होता. त्यामुळे आरक्षण मिळेल की नाही, या विवंचनेत तो होता. यातूनच त्याने गावालगत असलेल्या एका शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नातेवाईकांना समजताच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अधारे, पोलीस उपनिरीक्षक थोरवे , सूर्यकांत केजगीर, वंसत वाघमारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले. दरम्यान, विनायक शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहलेली आढळून आली. यामध्ये निवडणुका झाल्या तरी मराठा आरक्षण मिळाले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. याला मी स्वतः जबाबदार आहे, असा मजकुर लिहिला आहे.
या घटनेची नोंद चारठाणा पोलिसांत झाली आहे. विनायकच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई -वडील, एक भाऊ असा परिवार आहे. सोस येथे शुक्रवारी (दि. २२) सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.