

पूर्णा: शहराच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने तयार करण्यात येणार्या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात पडुन एका 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही दुदैवी घटना पुर्णा शहरातील हरीनगर भागात गुरूवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास घडली.
कंत्राटदाराकडुन टाकी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयास कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना केल्या नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. विश्वदीप संतोष कांबळे (वय 10 वर्ष, रा. नालंदनगर, पूर्णा) असं मयत चिमुकल्या बालकाचे नांव आहे.
मृत बालक घरातून खेळण्यासाठी गेला होता, पण तो परतलाच नाही, त्यानंतर घरातल्यांनी आसपासच्या परिसरात बालकाचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही, सायंकाळी ५ वाजल्यापासून तो बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनीही ही माहिती समाज माध्यमातून प्रकाशित करत, शोध मोहीम सुरूच ठेवली.
पोलिसांना गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास हरिनगर येथे पालीकेकडुन नव्याने तयार करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयात एका मुलाचा मृतदेह आढळून आला. पो.नि.विलास गोबाडे, सपोनि गजानन पाटील, फौजदार प्रकाश इंगोले व आमेर चाऊस आदीं पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत, त्याची शहानिशा केली असता तो मुलगा विश्वदीप कांबळे असल्याचे उघडकीस आले आहे. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून विश्वदीप हा पित्याचे छत्र हरवलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितील मोलमजुरी करणार्या कुटुंबातील मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुर्णा पालिकेच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचा पहिला बळी?
शहरातील पाणीपुरवठा योजना टाकीबांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 10 वर्षीय विश्वदीप कांबळे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, हा प्रकार पालिकेच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचा पहिला बळी ठरला आहे. कंत्राटदाराने काम करताना सुरक्षा उपाययोजना करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. या हलगर्जीपणामुळेच निष्पाप जीव गेला असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला असून, जबाबदार पाणीपुरवठा अभियंता, ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.