

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कथित आर्थिक गैरव्यवहार आणि प्रलंबित लेखा आक्षेपांवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ मनसे आक्रमक झाली आहे. मंगळवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर मनसेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. “कोट्यवधींचा हिशेब गिळून प्रशासन ढोंगी निद्रेत आहे,” असा घणाघाती आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
मनसेकडून गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जात होता. वारंवार निवेदने, पत्रव्यवहार आणि आंदोलने करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाने १ मेपर्यंत कारवाईचे आश्वासन दिले होते; मात्र मुदत संपल्यानंतरही कोणतीही प्रगती न झाल्याने मनसेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २०१७-१८ पासूनचे लेखा आक्षेप आजही प्रलंबित असून संबंधित फाईली धूळ खात पडल्या आहेत. या आक्षेपांमध्ये लाखो-कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा उल्लेख असूनही प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. “भ्रष्टाचाराचे पुरावे समोर असतानाही कारवाई न करणे म्हणजे दोषींना अभय देणे,” अशी तीव्र टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेने कथित गैरव्यवहारांचे पुरावे सादर केले होते. तरीही चौकशी, निलंबन किंवा गुन्हा नोंदविण्याची कोणतीही प्रक्रिया न झाल्याने हा प्रकार संगनमताने होत असल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “हिशेब द्या”च्या मागणीने परिसर दणाणून गेला. “विद्यापीठ ज्ञानाचे मंदिर की भ्रष्टाचाराचे अड्डे?” असा सवालही उपस्थित करण्यात आला.
या आंदोलनात जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, मनविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, पूर्णा तालुकाध्यक्ष अनिल बुचाले, शहर उपाध्यक्ष खंडू राऊत, सुरेश गडकरी, आनंद शिंदे, योगेश भोसले, कांचन कांबळे, सुदाम शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मनसेने प्रशासनाला इशारा देत स्पष्ट केले की, तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. “हिशेब द्या, अन्यथा संघर्ष अटळ!” असा इशारा देत पुढील काळात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इरादा व्यक्त करण्यात आला आहे. आता विद्यापीठ प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.