

Jintur Vanjari community March
जिंतूर : राज्याच्या क्रीडा मंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याविषयी सोशल मीडियावर बनावट खात्याद्वारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून वंजारी समाजाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ आज (दि.८) जिंतूर शहरात सकल वंजारी समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.
जिंतूर तालुक्यातील पृथ्वी भांबळे नावाच्या व्यक्तीने 'विष्णू नागरे' या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि राज्यातील प्रतिष्ठित व्यक्तींची बदनामी करणाऱ्या पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिंतूर शहरातील भगवान बाबा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला.
मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी नायब तहसीलदार राखे आणि पोलीस निरीक्षक सरोदे यांनी निवेदन स्वीकारले. संबंधित आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास भविष्यात वंजारी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.
या मोर्चात लक्ष्मण इलग, प्रसादराव बुधवंत, डॉ. पंडितराव दराडे, माधव दराडे, रामप्रसाद घुले, शिवाजी काळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"संबंधित आरोपीने दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करून संपूर्ण वंजारी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा घटना यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत. भविष्यात असे प्रकार घडल्यास तमाम वंजारी समाज रस्त्यावर उतरेल आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील."
- लक्ष्मण ईलग
"तालुक्यातील वंजारी समाज सर्व समाजबांधवांशी गुण्यागोविंदाने राहतो, हा इतिहास आहे. आरोपीने समाजाची नाहक बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असून, त्याला कठोर शासन झालेच पाहिजे. वंजारी समाज नेहमीच बोर्डीकर परिवाराच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि पुढेही राहील."
- माधव दराडे