

परभणी : ताडकळस, चूडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन जबरी चोऱ्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून मोबाईल, मोटारसायकली आणि रोकड असा सुमारे २ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. ५ मार्च २०२४ रोजी माधव गणेश बेले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोटारसायकल, मोबाईल फोन व रोकड जबरदस्तीने लुटली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गोंविंद अंकुशराव वारकड (वय 28, रा. सारंगी, ता. पूर्णा) याला अटक केली. चौकशीत त्याने चूडावा पोलीस ठाण्यातील आणखी एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात सहभागाची कबुली दिली. दि.७ डिसेंबर २०२३ रोजी मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्याला चूडावा येथे पैसे नेत असताना दोन मोटरसायकलस्वारांनी लाथ मारून खाली पाडले, मारहाण केली व चाकूचा धाक दाखवून रोकड लुटली होती. याप्रकरणीही गुन्हा नोंद होता.
आरोपीकडून मोटारसायकल, मोबाईल , मोटारसायकल, रोख १ लाख १५ हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीची सविस्तर चौकशी करण्यात येत असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व त्यांच्या टीमने पार पाडली. कारवाईत सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.