

Parbhani Surwadi farmers protest
पूर्णा : सुरवाडी (ता.पूर्णा) येथील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग मोजणी कार्यक्रम आज (दि.१) दुपारी उधळून लावला. पिंपळगाव बाळापूर, नावकी, कात्नेश्वर, आहेर वाडी, संदलापूर, सुरवाडी गाव शिवारातून जाणाऱ्या बहूचर्चित शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता भुमिअभिलेख अधिकारी, महसूल खात्याचे तलाठी, मंडळ अधिकारी पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले होते.
यावेळी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रस्त्यातून शेतकरी बाजूला न झाल्यामुळे अधिकाऱ्यांना मोजणी करता आली नाही. त्यामुळे त्यांना मोजणी न करता रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. या प्रसंगी, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी निक्षून सांगितले की, आमचे रक्त सांडले तरी आम्ही कदापी जमिनीची मोजणी होवू देणार नाही. शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा पावित्रा घेतला.
यावेळी गोविंदराव घाटोळ, हनुमान भुसारे, माधवराव पडोळे, नामदेवराव भुसारे, विश्वनाथ भुसारे, शहाजी भुसारे, उत्तम भुसारे, एकनाथ भुसारे, माधव वाघमारे, नागोराव भुसारे, पांडुरंग भुसारे, बळीराम भुसारे, लिंबाजी खंदारे, गोपाळ मोरे, महेश घाटोळ, अनंतराव घाटोळ आदीसह ५०० महिलासह ८०० शेतकरी उपस्थित होते.