

Soybean Rate Parbhani
पूर्णा : पूर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काही कमीशन एजंट व भुसार व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. सध्या नवीन सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येत असताना शासनाने सन २०२५–२६ हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव ५३२८ रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित केला आहे. तरीसुद्धा व्यापाऱ्यांकडून ३८०० ते ४२०० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केली जात आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा तब्बल हजार रुपयांनी कमी दराने व्यवहार सुरू आहेत.
शासकीय निर्देश असूनही व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने मार्केट समितीचे अधिकारी व पदाधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी वर्गांतून होत आहे. काही व्यापारी “डागी” किंवा “ओलसर” धान्याचे कारण देऊन शेतकऱ्यांचे सोयाबीन कमी दरात घेत आहेत.
आडत व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कृषी पणन खात्याअंतर्गत परवानगी असलेल्या काही भुसार दुकानदारांकडून आडत, हमाली व कट्टी न कपात करता थेट सोयाबीन खरेदी केली जाते. या व्यवहारांमध्ये केवळ कच्च्या पावत्या दिल्या जातात, तर अधिकृत गुलाबी पावत्यांचा वापर टाळला जातो. परिणामी, या “बेभाव” व्यवहारात शेतकऱ्यांची सरळ फसवणूक होते आहे.
तसेच, काही व्यापारी नियमांचे उल्लंघन करून सोयाबीन खरेदी केल्यानंतर गाड्या भरून थेट तेलमिलकडे माल पाठवत आहेत. नगदी रकमेच्या मोहात अनेक शेतकरी थेट भुसार दुकानदारांकडे माल विकत असल्याने पारंपरिक आडत व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत, असेही समजते.
एकंदरीत, अतिवृष्टीमुळे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता हमीभाव न मिळाल्याने दुहेरी फटका बसत आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी. जिल्हाधिकारी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पायबंद घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.