

Sonpeth Shirshi car hits bike
सोनपेठ: सोनपेठ तालुक्यातील मौजे शिर्शी येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू झाला, तर मागे बसलेला मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १५) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हा महामार्गावर सोनपेठहून परभणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच-२२ यू-७८५९) या चारचाकीची समोरून येणाऱ्या (एमएच-३४ व्ही-४४१९) या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार रिजवान दादामिया शेख (वय ६०, रा. शिर्शी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा नासिम रिजवान शेख गंभीर जखमी झाला. त्याच्यावर परभणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे परभणी–सोनपेठ महामार्गावरील सुरू असलेले अपघातांचे सत्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या घटनेची फिर्याद शेख इरफान यांनी सोनपेठ पोलिस ठाण्यात दिली असून, आरोपी व्यंकट रामराम पुंडकर (रा. साखला प्लॉट, परभणी) याच्याविरोधात गुन्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय किरकन करीत आहेत.