

परभणी : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या तीन एटीएममधून हार्ड डिस्क काढून चोरी केल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन नानलपेठ यांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण ३ लाख २ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परभणी शहरातील भिकुलाल पेट्रोल पंपाजवळील एटीएम, कांती चौकातील एटीएम आणि सुपर मार्केट रोडवरील महात्मा फुले कॉलनीजवळील एटीएममधून दि.८ ऑक्टोबर रोजी पहाटे अंदाजे २ ते ६ वाजेदरम्यान हार्ड डिस्क काढून चोरी करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि नानलपेठ पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. संयुक्त पथकाने अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी विशेष पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले.
या पथकाने तेथून तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस स्टेशन नानलपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सचिन उदय यादव (वय २३, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, छ. संभाजीनगर रोड, जालना), प्रफुल्ल शंकर सोनवणे (वय २२, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, छ. संभाजीनगर रोड, जालना) आणि विशाल धाकतोडे (वय २०, रा. मुकुंदवाडी, गल्ली क्र. ७, छ. संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी या कारवाईत स्कायहॉक कंपनीच्या ४ टीबी क्षमतेच्या तीन हार्ड डिस्क (किंमत १ लाख ३५ हजार रुपये), बुलेट क्र. एमएच-२०-एचपी-०६७२ (किंमत १ लाख ५० हजार रुपये), रेडमी मोबाईल फोन व त्यातील एअरटेल सिमकार्ड (किंमत १० हजार रुपये), सिमकार्ड नसलेला पोको मोबाईल फोन (किंमत ७ हजार रुपये) आणि २ स्क्रूड्रायव्हर (किंमत शंभर रुपये) असा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय काळ्या रंगाची सफारी सॅक बॅगही जप्त करण्यात आली असून, तिची किंमत नमूद करण्यात आलेली नाही. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख २ हजार १०० रुपये आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे आणि पोलीस स्टेशन नानलपेठचे पोलीस निरीक्षक विलास घोबाडे यांच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, नेताजी गित्ते, पोलीस हवालदार महेश पांगरकर, ईशाद शेख, पोलीस शिपाई प्रमोद पुरी, पोलीस नाईक संतोष सानप आणि पोलीस शिपाई विनोद चव्हाण यांनी सहभाग घेतला.
हार्ड डिस्क, मोबाईलसह ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जप्त मुद्देमालामध्ये ३ हार्ड डिस्क (४टीबी) १,३५,०००, बुलेट दुचाकी १,५०,०००, रेडमी मोबाईल व एअरटेल सिम १०,०००, पोको मोबाईल ७,०००, दोन स्क्रूड्रायव्हर १००, काळी सफारी सॅक बॅग असा एकूण ३,०२,१०० रुपये किमतीचा मुद्देेमाल हस्तगत करण्यात आला.