विधान परिषदेवर राजेश विटेकरांना मिळणार संधी: पक्षश्रेष्ठी पाळणार शब्द   

Rajesh Vitekar
Rajesh Vitekar

परभणी, पुढारी वृत्तसेवा : 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणूकीतील पराभवाने खचून न जाता 2024 मध्ये पुन्हा लोकसभेच्या रणांगणात उतरण्याच्या निर्धाराने जय्यत तयारी केलेल्या राजेश विटेकरांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानत महायुतीच्या उमेदवारासाठी केेलेल्या प्रयत्नांचे फळ पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व असलेले अजित पवार त्यांना विधान परिषदेतील संधीने देणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. त्यामुळे या जिल्ह्याला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच एक आमदार मिळण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेतील रिक्त होणार्‍या 11 जागांसाठी  12 जुलै रोजी मतदान

राज्य सरकारने विधान परिषदेतील रिक्त होणार्‍या 11 जागांसाठी मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी 25 जूनपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून 2 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. 5 जुलै रोजी अर्ज मागे घेता येणार असून 12 जुलै रोजी मतदान होवून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होणार आहे. विधानपरिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी हे प्रतिनिधीत्व करीत असून 27 जुलै रोजी त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ते निवृत्त होणार आहेत. दरम्यान, आ.बाबाजानी दुर्राणी यांना पक्षाकडून पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने व पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणूकीपूर्वी जाहीररित्या राजेश विटेकरांना आमदार करण्याचा शब्द दिलेला असल्याने विधान परिषदेच्या या निवडणूकीत विटेकरांना निश्‍चीतच संधी मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले राजेश विटेकर हे प्रारंभी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. काँग्रेसच्या प्रदेश युवक कार्यकारणीत त्यांनी पदे भुषविली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. त्यांच्यासह त्यांच्या मातोश्री देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. जिल्हा परिषदेवर गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे युवा नेतृत्व व ग्रामीण भागाशी असलेला जनसंपर्क लक्षात घेवून 2019 च्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. या निवडणूकीत त्यांनी शिवसेनेचे खा.संजय जाधव यांना काट्याची लढत दिली. परंतू निसटता पराभव त्यांच्या वाट्याशी आला. या पराभवानंतर देखील विटेकर हे सातत्याने पक्षीय कार्यात सक्रीय राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर त्यांनी ठामपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणूकीत विटेकर हेच महायुतीतील उमेदवार राहणार हे निश्‍चीत होते. तसे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना दिल्याने ते जोमाने कामास लागले होेते.

दरम्यान, राज्यातील राजकीय हालचालींमध्ये परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्यात आल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरतानाच विटेकर हे येत्या तीन महिन्यांत सभागृहात पोहचतील, असा जाहीर शब्द दिला होता. पक्षाचा आदेश मानून विटेकर यांनी जानकर यांची प्रचारयंत्रणा पूर्ण ताकदिनिशी हाताळली. मात्र जानकर हे पराभूत झाले असले तरी विटेकरांनी पक्षासाठी निवडणूक रिंगणात न येण्याचा घेतलेला निर्णय त्यांची एकनिष्ठता सिद्ध करणारा ठरला. निवडणूकीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य बैठकीत प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी विटेकर यांच्या या त्यागाचे जाहीर कौतुक करीत त्यांना पक्षनिष्ठेचे फळ दिले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर विधानपरिषदेच्या या निवडणूकीत राजेश विटेकरांना संधी मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

पक्षनिष्ठेचा दुसरा योगायोग

राजेश विटेकरांबाबत पक्षनिष्ठेचे फळ देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आश्‍वासक प्रयत्न करीत आहे. मात्र हा काही पहिलाच योगायोग नसून यापुर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आ.बाबाजानी दुर्राणी यांना पक्षनिष्ठेचे फळ अवघ्या दोनच महिन्यांत देण्याचे काम सहा वर्षांपूर्वी केले होते. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र काँग्रेस आघाडीत जागा बदलांच्या झालेल्या हालचालींत ही जागा काँग्रेसचे सुरेश देशमुख यांना सोडण्यात आली होती. या निवडणूकीसाठीही आ.बाबाजानी यांनी संपूर्ण तयारी केली होती. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका शब्दावर त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. त्याचवेळी पवारांनी बाबाजानी यांना लवकरच चांगले स्थान दिले जाईल, अशी ग्वाही दिली होती व दोनच महिन्यांमध्ये पक्षाच्या कोट्यातून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. त्याच संधीतून आ.बाबाजानी आता निवृत्त होत आहेत. तेही अजितदादा गटाचेच असल्याने त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेते. याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news