Parbhani rainfall shortage-आतापर्यंत केवळ १७ टक्केच पाऊस; खरिपाचा अडकला गाडा

परभणी जिल्ह्यात सर्वत्रच पावसाची असमान हजेरी; आगामी उत्पादनावर परिणाम होण्याच्या शक्यतेने शेतकरी हतबल
Parbhani rainfall shortage
Parbhani rainfall shortage
Published on
Updated on

परभणी : जून महिना संपून जुलैचा पहिला आठवडा उलटत असतानाही जिल्ह्यात मान्सूनने अद्याप जोरदार हजेरी लावलेली नाही. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी दमदार आणि सलग पावसाअभावी खरीप हंगाम संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. ७जुलैपर्यंतच्या अधिकृत पर्जन्यमान अहवालानुसार जिल्ह्यात जूनपासून अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ १७ टक्के पावसाची नोंद झाली असून, हंगामी सरासरीच्या तुलनेत अवघ्या ५५.२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या आशेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १२९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हा पाऊस अत्यंत असमान स्वरूपाचा असल्याने काही भागांत शेतांमध्ये ओलावा टिकून आहे, तर अनेक ठिकाणी जमिनी पुन्हा कोरड्या पडू लागल्या आहेत. मंगळवारी (दि.७) जिल्ह्यात सरासरी १.० मिमी इतकाच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दिलासादायक पाऊस पुन्हा हुलकावणी देऊन गेला. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आदी खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहे.

प्रारंभी झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली होती; मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतांमध्ये पिके करपू लागली आहेत. मातीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, पुढील काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुकानिहाय आकडेवारीत पूर्णा तालुका तुलनेने आघाडीवर असून तेथे १३७.० मिमी (८४.८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.

Parbhani rainfall shortage
Purna Hunger Strike | सुहागण येथील पांदण रस्ता कामाची चौकशी करा; युवकांचे आमरण उपोषण सुरू

पाथरीमध्ये १४६.२ मिमी (८०.३ टक्के), मानवतमध्ये १४०.४ मिमी (७८.९ टक्के), जिंतूरमध्ये १४९.१ मिमी (७७.३ टक्के) आणि गंगाखेडमध्ये १२७.३ मिमी (७५.८ टक्के) पाऊस झाला आहे. या भागांतही अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे सोनपेठ तालुक्याची स्थिती सर्वाधिक चिंताजनक असून तेथे केवळ ८७.४ मिमी (५०.५ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. पालममध्ये १०६.६ मिमी (५५ टक्के), सेलूमध्ये १२२.० मिमी (६३.१ टक्के) आणि परभणी तालुक्यात १२९.७मिमी (६१.९ टक्के) पाऊस झाला आहे.

या तालुक्यांतील शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी तातडीने मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. दरम्यान, हवामानातील सातत्याने बदलणारी परिस्थिती आणि पावसाचा खंड यामुळे कृषी आहे.

विभागही सतर्क झाला आहे. कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पिकांची नियमित पाहणी करण्याचा, तण नियंत्रणावर भर देण्याचा तसेच उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, निसर्गाची साथ लाभल्याशिवाय खरीप हंगामाला गती मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाचा प्रत्येक दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

Parbhani rainfall shortage
Parbhani District bank election | दिग्गजांचा मार्ग मोकळा, कार्यकर्त्यांचा प्रवास खडतर; परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक रंगणार

दमदार पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची, आर्थिक नुकसान वाढण्याची आणि दुबार पेरणीसाठी अतिरिक्त खर्चाचा भार शेतकऱ्यांवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आकाशाकडे लागले असून, वरुणराजा कधी मेहरबान होणार याचीच प्रतीक्षा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news