

Purna Vazur Tadkals crop damage
पूर्णा, ताडकळस : वझूर व ताडकळस सर्कल परिसरात गुरूवारी (दि. १४) मध्यरात्री झालेल्या प्रचंड ढगफुटीने सहा गावांतील शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. बानेगाव, माहेर, मुंबर, देवूळगाव दुधाटे, फुलकळस आणि धानोरा काळे या भागात तासभराहून अधिक काळ मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला.
पावसाचा जोर एवढा होता की, नद्या-नाले पुराच्या स्वरूपात वाहू लागले. या पुराच्या पाण्याने हळद, कापूस, मुग, उडिद, सोयाबीन आणि ऊस यांसह उभी बागायती व खरीप पिके अक्षरशः खरडून गेली. काही शेतांतील पिके उपटून पडली, तर ऊस पीक भुईसपाट झाले. किनाऱ्यालगतची पिकेही पुराच्या पाण्यात वाहून गेली.ही आपत्ती मध्यरात्री घडल्याने लोकांना सावरण्यास वेळच मिळाला नाही. सकाळी शेतकरी शेतात पोहोचले तेव्हा उभ्या पिकांचे उद्ध्वस्त झालेले दृश्य पाहून अनेक जण हवालदिल झाले.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज (दि.१५) नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या आणि एकाही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित न ठेवण्याच्या कडक सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. जिवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, ताकृअ संतोष भालेराव, मंडळ अधिकारी कालीदास शिंदे, सर्व तलाठी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांकडून तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होऊ लागली आहे.
दरम्यान, गुरूवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या भागातील शेतकरी रात्री झोपीत असताना मध्यरात्रीनंतर अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस एवढा जोराचा होता की, तास दीड तास जोरदार कोसळत अक्षरशः ढगफुटीच झाली. पूर सदृष्य पध्दतीने वेगाने पाणी वाहून पिके खरडून जात उपटून पडली. डौलाने उभी असलेली पिके एका रात्रीत होत्याचे नव्हती झाली. आता गरज आहे ती तात्काळ नुकसान भरपाई देण्याची.