Purna Accident | ताडकळस फाट्यावर हायवा- दुचाकीचा भीषण अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

नांदेड येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
Tadkalas Phata Accident Police Death
शिवराम आष्टुरकरPudhari
Published on
Updated on

Tadkalas Phata Accident Police Death

पूर्णा : शहरालगतच्या ताडकळस फाट्यावर १ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हायवा टिप्पर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या या कर्मचाऱ्यावर प्रथम पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या अपघातात मृत्यू पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव शिवराम मन्मथराव आष्टुरकर (वय ४५, रा. पेठशिवणी, ता. पालम, जि. परभणी) असे आहे. आष्टुरकर हे सध्या परभणी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्यालयात कार्यरत होते.

प्राप्त माहितीनुसार, शिवराम आष्टुरकर हे १ जून रोजी परभणी येथील पोलिस मुख्यालयात कर्तव्य बजावून दुचाकीने नांदेडकडे जात होते. सायंकाळी पूर्णा शहराबाहेरील नांदेड रोडवरील ताडकळस फाट्याजवळ पोहोचताच पाठीमागून येणाऱ्या हायवा टिप्परने (क्र. एमएच-२६ सीएच-३६७३) त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच-२६ बीयू-९७०५) जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्यासह शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर त्यांना तातडीने पूर्णा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना रुग्णवाहिकेद्वारे नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित वाहन पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्रीनिवास पडलवार करीत आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांत ताडकळस फाट्यावर घडलेली ही दुसरी जीवघेणी दुर्घटना आहे. यापूर्वी झालेल्या तत्सम अपघातात सातेफळ येथील एका तरुणाचा मृत्यू झाला होता, तर त्यांचे वडील गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान, शिवराम आष्टुरकर यांनी भारतीय सैन्यात तब्बल १५ वर्षे देशसेवा बजावली होती. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाले होते. त्यांच्या निधनामुळे पोलिस दलासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर २ जून रोजी पेठशिवणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news