

Purna Ration Grain Seized
पूर्णा : परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. १९ ) दोन स्वतंत्र कारवाया करत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि विनापरवाना साठवून ठेवलेले रेशनचे धान्य जप्त केले. या कारवाईत सुमारे २१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या कारवाईत शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका गोदामावर छापा टाकण्यात आला. यावेळी सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. पंचनाम्यानंतर ४० गोण्या गहू आणि ५९ गोण्या तांदूळ, अशा एकूण ९९ गोण्या जप्त करण्यात आल्या.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना राजमुद्रा चौक परिसरात पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना गुप्त माहिती मिळाली. नांदेडकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
संशयित स्कॉर्पिओ दिसताच चालकाने वाहन भरधाव वेगाने नांदेडच्या दिशेने पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर चालकाने वाहन रस्त्यात सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या 'गोवा गुटखा'च्या ४० बॅगा आढळून आल्या.
या कारवाईत सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा गुटखा आणि १४ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ, असा एकूण २१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, फौजदार अर्जुन टर्के, पोलीस हवालदार यशवंत वाघमारे, गोविंद चुडावकर, सूर्यकांत ताटीकोंडलवार, रंगनाथ दुधाटे, महेश कवठाळे, सचिन भदर्गे, दीपक मुदीराज, सूर्यकांत सातपुते, गजानन क्षीरसागर, लिंबाजी वाव्हळे आणि हनुमान ढगे यांच्या पथकाने केली.
या धडक कारवाईमुळे पूर्णा शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनाने अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.