Crop Insurance Scheme | पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; २०२५ च्या भरपाईचा खोळंबा ठरला कारणीभूत

पूर्णा तालुक्यात ५६ हजारांपैकी अवघ्या १९,९३४ शेतकऱ्यांनी भरला विमा हप्ता; मुदतवाढीची मागणी
Crop Insurance Scheme
Crop Insurance Scheme Pudhari
Published on
Updated on

Pradhan Mantri Pik Bima Yojana

पूर्णा : पूर्णा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील सुमारे ५६ हजार शेतकऱ्यांपैकी २४ जुलैअखेर केवळ १९ हजार ९३४ शेतकऱ्यांनीच पीक विम्याचा हप्ता भरला आहे. मागील खरीप हंगामातील नुकसानभरपाई अद्यापही मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असतानाही अपेक्षित प्रमाणात नोंदणी झालेली नाही. खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही संबंधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने अनेकांनी यंदा विमा भरण्याकडे पाठ फिरविल्याचे सांगितले जात आहे.

Crop Insurance Scheme
Parbhani News | परीक्षा शुल्काच्या अडथळ्यानंतर तीन महिन्यानंतर अखेर परभणीचा शिष्यवृत्ती निकाल जाहीर!

खरीप २०२५ च्या नुकसानभरपाईवरून कृषी विभाग आणि एआयसी (AIC) पीक विमा कंपनी यांच्यात मतभेद कायम आहेत. कृषी विभागाचे म्हणणे आहे की, पीक कापणी प्रयोगातून मिळालेल्या उत्पादनाच्या आकडेवारीनुसार भरपाई अदा करावी; तर विमा कंपनी सॅटेलाइटवरील ‘ग्रीन रिपोर्ट’च्या आधारे भरपाई निश्चित करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने हे प्रकरण रखडले आहे.

दरम्यान, २१ जुलै रोजी विभागीय आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणीत पीक कापणी प्रयोगाच्या (ड्राय रिपोर्ट) आधारे नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले होते. मात्र, हा निर्णय मान्य नसल्याने विमा कंपनीने कृषी आयुक्त, पुणे यांच्याकडे अपील दाखल केल्याची माहिती आहे. पुढेही निर्णय प्रतिकूल आल्यास कंपनी दिल्ली येथील केंद्रीय कृषी विभागाकडे अपील करू शकते. त्यामुळे अंतिम निर्णय आणि नुकसानभरपाई मिळण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Crop Insurance Scheme
Parbhani Court News | धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला दोन महिन्यांची शिक्षा: सेलू न्यायालयाचा निर्णय

मागील हंगामाची नुकसानभरपाईच अद्याप मिळालेली नसताना नव्याने पीक विमा भरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप २०२५ मधील प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने वितरित करावी तसेच चालू खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news