

Purna Taluka Pump Cable Theft
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील कानडखेड क्रमांक १ शिवारात पूर्णा नदीवर बसवलेल्या कृषीपंपांच्या तांब्याच्या केबल वायर चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अज्ञात चोरट्यांची सराईत टोळी सक्रिय झाल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.
बागायती पिकांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून नदीवरून शेतापर्यंत पाईपलाईन टाकल्या असून ५ ते ७.५ अश्वशक्तीचे विद्युत कृषीपंप बसवले आहेत. या पंपांना दिलेल्या तांब्याच्या केबल वायर कापून चोरट्यांकडून चोरी केल्या जात आहेत. गेल्या वीस दिवसांत सुमारे ७५ शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल वायर चोरीस गेल्याच्या दोन घटना घडल्या असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर, कानडखेड गावाजवळ बॉम्बे पुलानजीक पूर्णा नदीवर एका कृषीपंपाची केबल वायर कापून नेत असताना चोरट्यांना शेतकऱ्यांची चाहूल लागली. त्यानंतर चोरट्यांनी वायर कटरसह स्वतःचे बूट, चप्पल, स्वेटर, लुंगी आदी साहित्याचे गाठोडे घटनास्थळीच टाकून पळ काढला. शेतकऱ्यांनी पाठलाग केला, मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले.
या घटनेची माहिती देण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी शनिवारी (दि. ३) पूर्णा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यापूर्वीही रमेश गाडवे, शिवाजी गाडवे, प्रकाश कापसे, किशनराव गाडवे, दिनेश काळे, नागेश काशीकर, शेख अहमद, मारोती डोंगरे, गंगाधर महाजन, सलीम पठाण, श्रीरंग वाळवंटे, किशन देशमुख, मुंजा वैद्य यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबल वायर चोरीस गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
पूर्णा तालुक्यातील पूर्णा, अजदापूर, सोन्ना, कानडखेड, कावलगाव वाडी आदी गावांतील नदीकाठावरील कृषीपंपांच्या केबल वायर व स्टार्टर चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी चुडावा व पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असल्या तरी चोरट्यांचा तपास कासवगतीने सुरू असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वेळीच ठोस कारवाई न झाल्यामुळे चोरीच्या घटना सुरूच राहिल्या असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. चोरट्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अन्यथा अशा घटना वाढतच राहतील, अशी तीव्र अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.