

पूर्णा : येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील विश्रामगृह मागील अनेक वर्षापासून बंद अवस्थेत धुळखात पडून आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे महत्त्वाचे यजमान व्यक्ती, विविध खात्यामधील अधिकारी यांच्या मुक्कामाची गैरसोय होत आहे.
येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे शासकीय विश्रामगृह पूर्वीच्या कालावधीत सुस्थितीत सुरू होते. परंतू, हे विश्रामगृह पूर्वीप्रमाणे सुरू न ठेवता कुलूप ठोकून कायमचे बंद करण्यात आले. त्यामुळे हे विश्रामगृह नव्हे तर शोभेची वास्तू बनली आहे. विश्रामगृह का बंद ठेवण्यात आले? असा प्रश्न उप अभियंता संजयकुमार देशपांडे यांना विचारला असता ते दैनिक पुढारीशी बोलताना म्हणाले की, हे विश्रामगृह सुरू ठेवण्यासाठी येथील कार्यालयात अधिकच्या सेवक कर्मचा-यांची नियुक्ती नाही. मनुष्यबळ नसल्यामुळे अडचणी येत आहेत. त्याचबरोबर विश्रामगृहात काही कालावधीसाठी नोंद करुन मुक्कामी राहिलेले यजमान तथा अधिकारी कर्मचारी यांना चहापाणी, नास्ता, जेवण तयार करुन देण्यासाठी आचारी मिळत नाहीत. या कारणास्तव हे विश्रामगृह बंद ठेवावे लागत आहे.
हे विश्रामगृह सुरू ठेवण्यासाठी सबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय सेवकांची तात्काळ नियुक्ती करावी. या कामी खुद्द सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत, असा आरोप पुर्णा तालुक्यातील नागरिकांनी केला आहे. तसेच विश्रामगृह सुरू ठेवल्यास स्वयंपाकासाठी आचारी मिळतील, त्यामुळे हे विश्रामगृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या नवीन इमारातीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्या इमारतीचे आमदार, खासदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन न करताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनमानी पद्धतीने या इमारतीचे कार्यालय सुरू केले आहे.