Ganeshotsav 2026 | पूर्णा तालुक्यात २७८ ठिकाणी गणेश स्थापना; २३ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचे जल्लोषात आगमन; पोलिसांकडून चोख बंदोबस्त
Ganesh Chaturthi Purna
पूर्णा-गणेश उत्सवासाठी आपल्या लाडक्या बापाला विराजमान करण्यासाठी घेऊन जात असलेला गणेश भक्त सुजय हिवरेPudhari
Published on
Updated on

Ganesh Chaturthi Purna

पूर्णा : शहरासह पूर्णा तालुक्यात सोमवारी (दि. १४) श्री गणेशमूर्तींची मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळपासूनच गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुका काढत गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली.

पूर्णा, चुडावा आणि ताडकळस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यंदा एकूण २७८ ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील २३ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवत सामाजिक एकोपा आणि सलोख्याचा संदेश दिला आहे.

Ganesh Chaturthi Purna
Sambhajinagar Ganeshotsav 2026 : ताशाचा आवाज तररर झाला... बाप्पांचे धूमधडाक्यात आगमन

पूर्णा हद्दीत १०५ ठिकाणी गणेश स्थापना

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरासह २९ गावांमध्ये १०५ ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी ७ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविला आहे. शहरातील विविध भागांतील सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक सजावट केली असून, उत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. गणरायाच्या आगमनाने शहरापासून गावखेड्यांपर्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चुडावा हद्दीत सर्वाधिक १२६ गणपती

चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३५ गावांमध्ये १२६ ठिकाणी श्री गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यापैकी ११ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताडकळस हद्दीत ४७ ठिकाणी स्थापना

ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४९ गावांमध्ये ४७ ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी ५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना स्वीकारली आहे. ग्रामीण भागातही गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून, विविध मंडळांकडून धार्मिक, सामाजिक तसेच जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Ganesh Chaturthi Purna
Pune Ganeshotsav: ‘मोरया मोरया’च्या जयघोषात पुण्यनगरी गणेशमय; मानाच्या पाचही गणरायांचे दिमाखात आगमन!

पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णेचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, चुडावा ठाणेदार सुशांत किनगे आणि ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर जगताप यांनी आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

याशिवाय सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, शिवाजी सिंगणवाड, फौजदार अजय किरकण, श्रीनिवास पडलवार, फौजदार चव्हाण, फौजदार अर्जुन रणखांब, आमेर चाऊस यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बंदोबस्ताची अंमलबजावणी केली जात आहे.

गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news