

Purna Dhangar Takli youth murder
पूर्णा: पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ ऑगस्टरोजी धनगर टाकळी फाटा रोडलगतच्या शिवारात एका तरुणाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. स्थानिक गुन्हे शाखा व चुडावा पोलिसांच्या संयुक्त कार्यवाहीत या खुनाचा उलगडा करत अवघ्या ४८ तासांत आरोपीस जेरबंद करण्यात यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनगर टाकळी फाटा गावाजवळील पडीत भिंतीआड पालम तालुक्यातील वाणी पिंपळगाव येथील रोहिदास विक्रम शेवाळे (वय २६) या तरुणाचा मृतदेह १२ ऑगस्ट रोजी सकाळी आढळला होता. गळा चिरुन खून करून मृतदेह टाकण्यात आल्याचे स्पष्ट होताच मृताच्या आईने चुडावा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा व चुडावा पोलिस ठाण्याचे स्वतंत्र पथक तयार करण्याचे आदेश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अथक परिश्रम घेत अखेर आरोपीचा शोध लावला. तपासात शेख रमजान शेख मदार (वय ३९, रा. वाणी पिंपळगाव, ता. पालम) यानेच जुन्या आर्थिक वादातून रोहिदास शेवाळे याचा निर्घृण खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपीस अटक करून चुडावा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखा आणि चुडावा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच सायबर गुन्हे शाखेने महत्त्वाची भूमिका बजावली. अटक केलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.