

Sajgirkrupa temple submerged
पूर्णा : तालुक्यातील आहेरवाडी शिवारात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे थुना नदीला मोठा पूर आला. या पुराच्या पाण्याने गावातील प्रसिद्ध सजगीरकृपा देवस्थान मंदिर जलमय झाले असून, परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मंदिराजवळील आहेरवाडी–कात्नेश्वर मार्गावरील पुलाची उंची सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढवली नसल्यामुळे पूरपाणी थेट पुलावरून वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रविवारी रात्री ६ वाजल्यापासून पहाटेपर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्यात सतत वाढ झाली. परिणामी, पूरपाणी शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. यापूर्वीही अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले असताना, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
पूर्णा–झिरोफाटा मार्गावरील माटेगावजवळील नदीपात्रात सुरू असलेले पुलाचे काम अपूर्ण असल्याने, दररोज पुरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मागील तब्बल बारा दिवसांपासून बंद आहे. परिणामी, वाहनचालक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शेतकऱ्यांचे शेतात जाणेही कठीण झाले आहे. स्थानिक शेतकरी व प्रवासी वर्गांतून संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी होत आहे.