परभणी : १० हजारांची लाच घेताना परभणी पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.२४) रंगेहाथ अटक केली. १५ व्या वित्त आयोगामध्ये अंगणवाडीतील कंपाऊंड वॉल व नाली बांधकामाची मोजमाप पुस्तिका लिहण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. अण्णासाहेब किसनराव तोडे (वय ५६) असे या अभियंत्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, परभणी पंचायत समिती अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून एका कंत्राटदाराने अंगणवाडीचे कंपाऊंड वॉल व नालीचे बांधकाम केले होते. या बांधकामाची मोजमाप पुस्तिका (एमबी) लिहिण्यासाठी त्यांनी पंचायत समितीकडे कागदपत्रे सादर केली होती. या संदर्भात ४ मार्च रोजी कंत्राटदाराने शाखा अभियंता अण्णासाहेब तोडे याची भेट घेतली असता मोजमाप पुस्तिका लिहण्यासाठी १० हजार रूपये लागतील, असे त्याने सांगितले. त्यावर कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क करून या संदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपतच्या पथकाने १८ मार्च रोजी पडताळणी केली असता अभियंता तोडे यांनी मोजमाप पुस्तिका लिहून कंत्राटदाराच्या ताब्यात देत बांधकामाची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर दहा हजार रूपये आणून द्यावे लागतील, अशी मागणी केली.
या पडताळणीच्या आधारे व कंत्राटदाराचे पैसे जमा झाल्याने आज पथकाने सापळा रचला. या दरम्यान अभियंता तोडे याला १० हजाराची लाच घेताना त्याला लाचलुचपतने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता लाचेच्या दहा हजारासह एक हजार तीनशे तीस रूपये व एक मोबाईल फोन आढळून आला. तो जप्त करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील पोलिस निरीक्षक माधुरी यावलीकर (नांदेड), सहाय्यक फौजदार निलपत्रेवार, हवालदार अनिरूद्ध कुलकर्णी, सिमा चाटे, अतुल कदम, नामदेव आदमे, जे.जे. कदम यांच्यासह नांदेडच्या लाचलुचपतमधील ईश्वर जाधव, शाम गोरपल्ले यांनी केली.
अण्णासाहेब तोडे याचे कारेगाव रोडवरील यशोधन नगरात निवासस्थान असून या निवासस्थानाची एसीबीच्या पथकाने झडती घेतली. यावेळी ५८ हजार ५०० रूपये रोख व ८० ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले.