

मानवत : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नताशा माथुर यांनी मंगळवारी ता 9 मानवत तालुक्यातील रामपुरी, रामेटाकळी व पोहंडूळ या तीन गावांतील पाणीयोजनांची पाहणी केली. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या या पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्ष पाहणी करत झाडाझडती घेऊन त्यांनी अपूर्ण कामावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
तालुक्यातील रामपुरी येथील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेले काम अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास येताच मुख्य कार्यकारी अधिकारी नताशा माथूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच संबंधित कंत्राटदाराला तात्काळ पाचारण करून जानेवारी महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले. यावेळी त्यांनी रामपुरी येथील दोन अंगणवाड्यांना अचानक भेट दिली. यापैकी अंगणवाडी क्रमांक १ मध्ये साठवलेल्या धान्यात किडे आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पारा चांगलाच चढला. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना जबरदस्त समज देत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले.
यानंतर रामेटाकळी व पोहंडूळ या दोन्ही गावांतील जलजीवन मिशनच्या कामाची त्यांनी पाहणी केली. येथे झालेले काम आणि त्याची गुणवत्ता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. पोहडूळ येथे वरच्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचत असल्याने कामाची गुणवत्ता उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रामेटाकळी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील शालेय उपक्रमांची त्यांनी पाहणी केली. विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. पोहंडुळ येथील शाळा व तेथील शैक्षणिक उपक्रमांचीही त्यांनी पाहणी करून प्रशंसा केली. या पाहणी दौऱ्यावेळी कार्यकारी अभियंता दिनकर घुगे, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी गोरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.