

Parbhani News: Vegetable prices have crashed; growers are worried as returns fail to cover production costs
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : शहरासह तालुक्यातील भाजीपाला उत्पादकांवर यंदा दुहेरी संकट कोसळले. एकीकडे मोठ्या मेहनतीने घेतलेल्या भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन झाले असले, तरी दुसरीकडे बाजारातील दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. भाजीपाल्याला मिळणारे दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून अनेकांवर भाजीपाला शेतातच टाकण्याची किंवा गुराढोरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील पांगरा, मरसूळ, पिंपळा लोखंडे, टाकळी, गोविंदपूर, बरबडी, कानडखेड, कान्हेगाव, खुजडा, ममदापूर, गणपूर सुकी, माटेगाव, सुरडवाडी, आहेरवाडी, कावलगाव, कलमुला, रुंज, पेनूर, धानोरा आदी गावांत मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड होते. आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन व सुधारित बियाण्यांच्या मदतीने अनेक शेतकरी वर्षभर भाजीपाला उत्पादन घेतात. यंदा अनुकूल वातावरणामुळे भेंडी, पडवळ, दुधी भोपळा, कद्दू तसेच विविध पालेभाज्यांचे भरघोस उत्पादन झाले.
मात्र, उत्पादनात वाढ झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाली आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला. सध्या भेंडीला केवळ १० रुपये प्रतिकिलो, तर दुधी भोपळ्याला अवघे २ रुपये प्रतिनग असा दर मिळत आहे. या भावात तोडणी, मजुरी, पॅकिंग, वाहतूक आणि बाजार समितीपर्यंत पोहोचविण्याचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. अनेक ठिकाणी भाजीपाला काढण्यासाठी मजूर लावणेही परवडत नसल्याने पिके शेतातच पडून राहत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर भाजीपाला जनावरांना खाऊ घालण्यास सुरुवात केली.
त्यामुळे त्यांच्या कष्टांवर अक्षरशः पाणी फिरले. भाजीपाल उत्पादनासाठी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी, सिंचन, मजुरी आणि वाहतूकवर मोठा खर्च कराव लागतो. या सर्व खर्चानंतरही बाजारात योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना य दरघसरणीचा सर्वाधिक फटका बसत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून अत्यल्प दराने भाजीपाला खरेदी केला जात असताना शहरातील किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना तोच्च अनेक पटीने जास्त दराने विकला जात आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील या मोठ्या दरतफावतीमुळे मध्यस्थांच फायदा होत असताना शेतकरी मात्र तोट्यात जात असल्याच भावना व्यक्त होत आहे.
विशेष प्रोत्साहन अनुदानाची मागणी
भाजीपाला पिकांवर लाखोंची गुंतवणूक करूनही बाजारभाव घसरल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजीपाला उत्पादकांना विशेष आर्थिक मदत, प्रोत्साहनपर अनुदान तसेच नुकसान भरपाई देण्याची योजना कृषी विभागामार्फत तातडीने राबवावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून जोर धरू लागली. तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने बाजार हस्तक्षेप योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.