

बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व उपक्रम राबविण्यात आला. बुधवारी (दि.१८) शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर तब्बल १२०० चौरस फुटांमध्ये फोम शीटच्या माध्यमातून शिवरायांची भव्य व देखणी प्रतिकृती साकारण्यात आली.
कौसडी केंद्रातील जि.प. प्रशाला कौसडी, केंद्रीय प्राथमिक शाळा कौसडी, प्राथमिक उर्दू शाळा कौसडी आणि कन्या शाळा कौसडी या चारही शाळांतील एकूण ३९६ विद्यार्थ्यांनी ३९६ फोम शीटचा वापर करून ही प्रतिमा उभी केली. विद्यार्थ्यांच्या अचूक मांडणी, शिस्तबद्ध नियोजन आणि समन्वयामुळे मैदानावर साकारलेली ही प्रतिकृती डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.
ही कलाकृती प्रसिद्ध रंगोळीकार ज्ञानेश्वर आप्पाराव बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. त्यांनी अनेक दिवस अथक परिश्रम घेत नियोजन, मोजमाप, रंगसंगती व विद्यार्थ्यांची मांडणी यामध्ये बारकाईने लक्ष घातले. प्रतिमा साकारताना सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे संपूर्ण कौसडी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रतिकृतीचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शिवरायांच्या प्रतिमेसमोर उपस्थितांनी अभिमानाने मानवंदना दिली. यावेळी जि.प. प्रशाला कौसडीचे माजी मुख्याध्यापक शिवानंदराव कौसडीकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात रंगोळीकार ज्ञानेश्वर बर्वे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पत्रकार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, या भव्य प्रतिकृतीचे चित्रीकरण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात आले असून आकाशातून टिपलेले दृश्य अत्यंत आकर्षक व नेत्रदीपक ठरले. विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेला हा उपक्रम तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला असून सामाजिक ऐक्य, शिस्त व इतिहासाविषयीची जाणीव जागृत करणारा ठरला आहे.