

पूर्णा : शहराच्या मुख्य रस्त्यावर मोकाट गाढवांनी घातलेल्या हैदोसामुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी (दि.९ जानेवारी) संध्याकाळी बसस्थानकासमोरील चंद्रलोक हॉटेलजवळ गाढवांच्या झुंजीमुळे एक प्रवासी ऑटो रिक्षा उलटली. या अपघातात १२ वर्षांचा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून, तो मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रांतीनगर येथील रहिवासी शेख कैफ कलिम (वय १२) हा ऑटोने प्रवास करत असताना ही घटना घडली. रस्त्याच्या मधोमध काही गाढवे एकमेकांवर खेकसून लाथा मारत होती. या गोंधळात धावणारा ऑटो गाढवांच्या तावडीत सापडून अचानक पलटी झाला. या भीषण अपघातात कैफ ऑटोखाली दाबला गेला, ज्यामध्ये त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या अपघातामुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पूर्णा नदीपात्रातून वाळू चोरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गाढवांचा वापर केला जातो. वाळू उपसा झाल्यावर ही गाढवे शहरात मोकाट सोडून दिली जातात. रेती माफिया महसूल आणि पोलीस प्रशासनाला न जुमानता हा व्यवसाय वर्षानुवर्षे करत आहेत. रस्त्यावरील या गाढवांमुळे पादचारी, महिला आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते, मात्र पालिका प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मोकाट गाढवांची फौज अपघाताला पर्वणी ठरत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आता स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.