Parbhani News : धावत्या एसटी बसची आग विझवताना चालकाची प्रकृती बिघडली, वैद्यकीय रजेसाठी विनवणी पण...

रजेचा अर्ज स्विकारण्यास आगार प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप
एआय इमेज
एआय इमेज
Published on
Updated on

परभणी : राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी-बीड मार्गावरील बसला मानवतजवळ धावत्या स्थितीत आग लागल्याची घटना रविवारी (दि. ११) घडली. चालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, आग विझवताना प्रकृती बिघडलेल्या चालकाचा वैद्यकीय रजा अर्ज स्वीकारण्यास आगार प्रमुख काळम पाटील यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप होत असून, यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रवाशांचा जीव वाचवला, पण स्वतःची प्रकृती खालावली

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी आगारातील चालक गजानन गायकवाड हे दुपारी २ वाजेच्या परभणी-बीड फेरीवर कार्यरत होते. बस मानवत येथील सावता माळी परिसरात पोहोचताच मागील टायरला अचानक आग लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गायकवाड व वाहक इरफान यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. यानंतर बसमधील अग्निशमन यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणली व प्रवाशांची पर्यायी बसने व्यवस्था केली.

प्रशासनाकडून रजा अर्जासाठी अडवणूक

या धावपळीत अग्निशमन यंत्रातील पावडर नाका-तोंडात गेल्याने चालक गायकवाड यांची प्रकृती बिघडली. त्यांना मळमळ व चक्कर येण्याचा त्रास सुरू झाल्याने मानवत येथील शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासह रजेचा अर्ज दिला. सोमवारी (दि. १२) हा अर्ज एटीएस गणेश भोसले यांच्याकडे सादर केला असता, त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते. त्यानंतर कंट्रोलर दिवटे व आगार व्यवस्थापक काळम पाटील यांच्याकडेही प्रयत्न झाला, परंतु तेथूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

संघटनेच्या मध्यस्थीनंतर अर्ज स्वीकारला

शेवटी विभागीय कामगार संघटनेचे सचिव गोविंद वैद्य यांनी विभागीय वाहतूक अधिकारी साळुंखे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आगार व्यवस्थापकांनी अर्ज स्वीकारला. मात्र, अर्ज घेऊन गेलेल्या कर्मचाऱ्याशी अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्याऐवजी प्रशासनाकडून असंवेदनशील वागणूक मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी गोविंद वैद्य यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news