

मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर दशक्रिया विधी साठी आलेल्या एका जावयाचा पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीत बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता 21 तालुक्यातील रामपुरी बु येथे घडली.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथील सुरेश तुळशीराम रासवे हे आपल्या कुटुंबासह सासू सुमन जनार्दन काळे (रा. रामेटाकळी, जि. परभणी) यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी सकाळी रामपुरी (बु.) येथील घाटावर आले होते. यावेळी सुरेश रासवे हे आंघोळीसाठी गोदावरी नदीपात्रात उतरले; परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
रामपुरी येथील युवकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर मानवत, पाथरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या व एनडीआरएफची टीम यांच्यासह रामपुरी येथील ग्रामस्थ व युवकांनी शोध मोहीम सुरू केली. घटनेची माहिती मिळताच बीट जमादार सिद्धेश्वर पाळोदे, बंकट लटपटे, शफीक शेख, उत्तम धबडगे, प्रल्हाद दुधाटे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात काढून रामपुरी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी देण्यात आला. सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावयाचा गोदावरीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःख व्यक्त होत आहे.