परभणी -मानवत तालुक्यातील मंगरूळ बु. येथील एका गतिमंद महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास १ महिना साध्या कैदेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग २) ए.ए. शेख यांनी सुनावली.
मानवत तालुक्यातील मंगरूळ बु. येथील शेख मकसूद शेख नुर याने एका मतिमंद महिलेस जबरदस्तीने पळवून नेले. ती मतिमंद आहे. हे माहिती असताना तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यावेळी महिलेच्या पतीने त्यास पाहिल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
पळून जात असताना त्याच्या पायाचे चप्पल घटनास्थळावरच पडलेली होती. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनंतर मानवत पोलिस ठाण्यात ८ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्या पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून चप्पल जप्त केली. तसेच पांढऱ्या रंगाचा रूमालही तेथून जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अॅड. अभिलाषा पाचपोर यांनी एकूण ५ साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी व घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवालाच्या आधारे शेख मकसुद यास दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश शेख यांनी त्यास सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व तसेच अन्य एका कलमानुसार १० वर्षाची कैद व १० हजार दंड, कलम ३७६ नूसार १० वर्ष कैद व १० हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाची वसूल रक्कम २५ हजार रुपये पीडितेस देण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले. कोर्टपैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक संतोष सानप, फौजदार सुरेश चव्हाण, अंमलदार प्रमोद सूर्यवंशी, हवालदार वंदना आदोडे, सय्यद रहीम यांनी काम पाहिले.