Parbhani News | परभणीत उपवर्गीकरण आंदोलनातील राज्यस्तरीय कार्यकर्त्याच्या घरावर मध्यरात्री हल्ला!

कारवर दगडफेक करून लाखोंचे नुकसान; शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, कटाचा संशय
हल्लेखोरांनी कारचे केलेले नुकसान
हल्लेखोरांनी कारचे केलेले नुकसान
Published on
Updated on

परभणी : अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरण आंदोलनातील राज्यस्तरीय कार्यकर्ते गणपत देवराव भिसे यांच्या परभणीतील घरासमोर उभी असलेल्या कारची अज्ञातांनी दगडफेक करून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १९) मध्यरात्री घडली. या घटनेत कारचे सुमारे १ लाखांचेे नुकसान झाले असून, आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, आंदोलनाशी संबंधित वैमनस्यातून हा हल्ला झाला का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

परभणी शहरातील रामनगर भागातील गणपत देवराव भिसे यांनी याबाबत नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरण आंदोलनात राज्यभर सक्रियपणे कार्यरत आहेत. रविवारी रात्री सुमारे ११ वाजता जेवण करून ते घरी विश्रांती घेत असताना सोमवारी (दि. २०) पहाटे सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घराबाहेरून मोठमोठ्याने आरडाओरडा आणि अश्लील शिवीगाळ करण्याचा आवाज आला.

आवाज ऐकून ते घराबाहेर येण्यासाठी निघाले असता, कुटुंबीयांनी बाहेर गेल्यास हल्ला होण्याची शक्यता असल्याने त्यांना रोखले. बाहेर दोन अज्ञात व्यक्ती उभ्या राहून त्यांना बाहेर येण्याचे आव्हान देत सातत्याने शिवीगाळ करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेे. भिसे बाहेर न आल्याने संतप्त झालेल्या दोघांनी घरासमोर उभी असलेल्या टाटा झेस्ट (एमएच-२२ यू-७२३२) या चारचाकी वाहनावर मोठमोठे दगड फेकले. या दगडफेकीत वाहनाच्या समोरील, पाठीमागील तसेच डाव्या बाजूच्या काचा पूर्णपणे फुटल्या. या तोडफोडीत सुमारे १ ते सव्वा लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विशेष म्हणजे, तोडफोड करून जाताना संबंधितांनी पुन्हा एकदा अश्लील शिवीगाळ करत भिसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, आपल्या आरक्षण उपवर्गीकरण आंदोलनातील सक्रिय भूमिकेमुळेच हा हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. फिर्यादीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. घटने दरम्यान घराशेजारून एका मोटारसायकलवर तीनजण जाताना दिसले. हे तिघेही कारची तोडफोड करणाऱ्या दोघांचे सहकारी असावेत, अशी शंका भिसे यांनी व्यक्त केली असून, त्यांच्या भूमिकेचाही तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीद्वारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. सामाजिक व आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्याच्या घरावर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपींना तातडीने अटक करून घटनेमागील नेमका हेतू उघड करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news