

Manvat Navodaya Vidyalaya Exam Center Cancelled
मानवत : मागील अनेक वर्षापासून येथील नेताजी सुभाष विद्यालयात सुरू असलेले जवाहर नवोदय पूर्व परीक्षेचे केंद्र शिक्षण विभागाने विनाकारण अचानक रद्द केले आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. तरी परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी विद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबद्दल माहिती अशी की, जवाहर नवोदय परीक्षासह इतर सर्व प्रवेश पूर्व परीक्षेसाठी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील विदयार्थ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून येथील नेताजी सुभाष विद्यालय हे परीक्षा केंद्र आहे. येत्या 13 डिसेंबरला नवोदय परीक्षा असून जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने येथील परीक्षा केंद्र अचानक रद्द केले. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
याबाबत नेताजी सुभाष विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लाड यांनी परभणीच्या जवाहर नवोदय विद्यालयाला पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शासनाच्या सर्व पूर्व प्रवेश परीक्षा सदरील केंद्रावर गेल्या अनेक वर्षापासून घेण्यात येत असून या केंद्रावर सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. या केंद्रावर अद्यापपर्यंत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. शिक्षण विभागानेही कोणतीही पुर्व सूचना ना देता परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार असल्याने परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू करावे.