

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: परभणीचे खासदार साहेब मला पाडायला तुम्हाला दहा जन्म घ्यावे लागतील. मी गेल्या पाच वर्षात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेची विकासाच्या माध्यमातून ईमानदारीने सेवा केली आहे. हजारो रुपयांचा निधी आणून सर्वांगीण विकास साधला आहे. त्यामुळे तुमच्या सारखे कितीही नेते आले, तरी मी निवडणुकीत पडणार नाही. कारण मी जनतेच्या मनात घर केले आहे. कधीही जनतेची मान झुकेल, असे कृत्य होऊ देणार नाही, असा इशारा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना दिला. (Ratnakar Gutte on Sanjay Jadhav )
पूर्णा तालुका आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ व रासपा आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमात ते आज (दि.७) बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही निवडणुकीत गंगाखेडमध्ये मुक्काम ठोकून तुमच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून लोकांना फोन करुन धमकावण्याचा प्रयत्न करत माझ्या विरोधात काम केले. परंतु सुजाण जनतेने तुमच्या धमकीला भीक न घालता विकासाच्या मुद्द्यावर भरघोस मतांनी मला निवडून दिले. माझ्या सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे धोतर फेडण्याची भाषा करून नको ते शब्द वापरून धमक्या दिल्या. जनतेवर दादागिरी करणे बंद करा, हा रत्नाकर गुट्टे या पुढे परभणी जिल्ह्यातील जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. लोकांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहिल, असा विश्वास गुट्टे यांनी व्यक्त केला. (Ratnakar Gutte on Sanjay Jadhav )
यावेळी प्रवक्ते संदीप माटेगावकर, गणेशराव रोकडे, युवानेते प्रताप कदम, उत्तमराव ढोणे, रामकिशन रौंदळे,विदीज्ञ घनश्याम डाखोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई, शहराध्यक्ष नितीन उर्फ बंटी कदम, छगनराव मोरे, प्रभाकर डाखोरे, खंडू पवार, सैनाजी माठे, नंदकुमार डाखोरे, नारायण मोरे, संभाजी मोहिते, गीताराम देसाई, चांदोजी बोबडे, हरिभाऊ कदम, प्रविण अग्रवाल, दाजीबा भोसले, प्रशांत कापसे, बालाजी कदम,असलम पठाण, अमिन, माधव देसाई आदी उपस्थित होते.