

Manwat Road railway station express train halt
मानवत : तालुक्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, या मुख्य मागणीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी तालुका रेल्वे संघर्ष व विकास समितीने केली आहे. या मागण्यांसाठी समितीच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागीय व्यवस्थापक प्रमोद कामले यांना मंगळवारी (दि.५) निवेदन सादर करण्यात आले.
मानवत रोड रेल्वे स्टेशन हे मानवत, पाथरी, सोनपेठ आणि माजलगाव या चार तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून येथे प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. सध्या मानवत रोड स्थानकाचा समावेश अमृत भारत योजनेत करण्यात आला असून, विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत.
या पार्श्वभूमीवर समितीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अनेक एक्सप्रेस गाड्यांना येथे थांबा नाही. त्यामुळे मानवत, पाथरी, माजलगाव तालुक्यातील विद्यार्थी, रुग्ण आणि पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पाथरी ही साईबाबा जन्मभूमी असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात, मात्र थांबा नसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. सणासुदीच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार तोष्णीवाल, कार्याध्यक्ष प्रसाद जोशी, सचिव शाम झाडगावकर, सचिन मगर, प्रकाश करपे, प्रफुल्ल जैन आदी उपस्थित होते.
नांदेड-पुणे एक्सप्रेस, हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस, मुंबई-नांदेड नंदीग्राम एक्सप्रेस या गाड्यांना मानवत रोड स्थानकावर थांबा द्यावा.
कोच इंडिकेटर सुविधा उपलब्ध करावी.
पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा द्यावी.
मानवत रोडवरील रेल्वे गेट बंद करू नये.