

मानवत: मानोली ते मानवत या रस्ता कामासाठी मानोली येथील नागरिकांनी आगामी जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनास निवेदन दिले आहे.
मानोली–मानवत रस्ता गेली १५–२० वर्षे जीर्ण अवस्थेत असून नागरिक, विद्यार्थी व रुग्णांना रोजची कसरत करावी लागत आहे. 15 मिनिटाच्या प्रवासासाठी तासाभर लागत आहे. सदरील रस्ता दुरुस्त करावा यासाठी ग्रामस्थांनी वारंवार निवेदनं दिलेले असून फक्त आश्वासन मिळाले आहे. प्रत्यक्षात काम मात्र काहीच झाले नाही. अखेर ग्रामस्थांनी कडवे पाऊल उचलत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांविरोधात मतदानावर बहिष्कार जाहीर केला.
आधी रस्ता , नंतर निवडणूक
रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मतदान नाही असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. साडेसात किलोमीटर रस्त्यातील साडेचार पीडब्ल्यूडीकडे, तीन किलोमीटर जिल्हापरिषदकडे अशा प्रकारे दोन्ही विभागांत रस्ता अडकला असून गेल्या 10 वर्षात काम मात्र शून्यावर आहे. कोल्हा जिल्हा परिषद सर्कलमधील मानोली हे मोठे गाव आहे. या गावच्या मतदानावर जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो . येथे मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकीत पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवेदनावर मानोली या गावातील ५० ते १०० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.