परभणी : येथील एका शेतकर्याकडून १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.२६) महावितरणच्या कंत्राटी तंत्रज्ञाला रंगेहाथ पकडले. त्याच्यासह याप्रकरणात सामील असलेल्या शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतातील वीजपुरवठा करणारे रोहित्र पावसाळ्यापासून बंद असल्याने संबंधित शेतकर्याने मानवत येथील महावितरण कार्यालयातील शाखा अभियंत्याकडे धाव घेतली होती. या संबंधित शाखा अभियंता मोहम्मद तलहा मोहम्मद हिमायत यांने हे काम मार्गी लावण्यासाठी संबंधित शेतकर्याकडे १५ हजाराची मागणी केली होती. शेतकर्याला लाच द्यायची नसल्याने त्याने परभणीतील एसीबी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. दरम्यान याप्रकरणी एसीबीच्या पथकाने मंगळवारी तक्रारीची पडताळणी केली. आणि सापळा रचून ही १५ हजारांची लाच शेतकर्याला कंत्राटी तंत्रज्ञ महेश शिवरूद्र कोल्हेकर याच्याकडे देण्यास सांगितले. पथकाने कोल्हेकर याला शेतकर्याकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, ही कारवाई नांदेडचे पोलिस अधिक्षक संदीप पालवे व अपर पोलिस अधिक्षक डॉ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीचे पोलिस उप अधिक्षक अशोक इप्पर, निरीक्षक अल्ताफ अयुब मुलानी यांनी केली.