

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पालम तालूक्यातील केरवाडी येथील एका ६५ वर्षिय शेतक-यास पूर्णा तालूक्यातील आरोपींनी शेत दाखवतो म्हणून फूस लावून मोटारसायकलवरुन घेऊन आले. त्यानंतर पूर्णेतील रेल्वे पुलाजवळ रात्रीच्यावेळी बोटातील अंगठी काढून घेत डोके व कपाळ दगडाने ठेचून निर्घृण खून केला. त्याचा मृत्यू झाला असे समजून फेकून दिले होते. मात्र शेतकरी रात्रभर जखमी अवस्थेत होता. याची माहीती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी नांदेड येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले होते. उपचारा दरम्यान ६ मार्च रोजी शेतकऱ्याचा मृत्यू झाला.बालासाहेब बापूराव जाधव (वय ६५) रा.केरवाडी ता पालम असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
या खून प्रकरणी पालम पोलिसांनी पूर्णा तालुक्यातील आरोपींना अटक केले. त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना एम सी आर सुनावून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या खुन प्रकरणाची अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित करण्यासाठी आ.डॉ रत्नाकर गुट्टे यांच्याकडे मयताच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालम तालूक्याच्या केरवाडी येथील शेतकरी बालासाहेब बापूराव जाधव (मयत) हे ३ मार्च रोजी सकाळी मोटारसायकलने पालम येथे गेले होते. त्याठिकाणी आरोपी हारीभाऊ रानबा मोहीते (वय ३७)रा.महागाव ता पूर्णा , हनूमान अंबोरे,बाळू जाधव दोघे रा.ताडकळस, तर प्रदिप मोहीते, जगन्नाथ मोहीते, काशिनाथ मोहीते, शिवाजी रोडगे रा.महागाव ता पूर्णा यांनी जाधव यांना रात्री शेती दाखवतो म्हणून फूस लावून मोटारसायकलने पेठशिवणी मार्गे पूर्णा येथे रेल्वे पुलाजवळ नेले. याठिकाणी त्यांना मारहाण करुन फेकून देवून पळून गेले. त्यानंतर ४ मार्च रोजी सकाळी एका व्यक्तीने केरवाडी येथील एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेल्या माहिती. जाधव यांच्या मुलाने त्यांना उपचारासाठी दाखल केले. प्रकरणाचा पुढील तपास पूर्णा येथील उविपोअ डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनात पोनि सुरेश थोरात हे करत आहेत.